अमरावती : पृथ्वीचे तापमान हे गेल्या दहा वर्षांपेक्षा आता चार पटीने वाढलय. त्याचे दुष्परिणाम आपल्या पिढीसह येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहेत. अधिक तापमानामुळे समुद्राची पातळी वाढायला लागली आहे. काही बेटी ही नाहीशी होत आहेत. यासोबतच समुद्रातील प्रदूषणासह इतर अनेक कारणांमुळे माशांचे खाद्य देखील कमी व्हायला लागलय. त्यामुळे भविष्यात मासे लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. शेतीला पर्याय म्हणून पोट भरण्यासाठी निवडलेला मासेमारी उद्योग देखील हवामान बदलामुळे तिकडे अशक्य असल्याची भीती भूगोल विषयाच्या तज्ञ डॉ. शुभांगी देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात भूगोल दिनानिमित्त आयोजित भूगोल प्रदर्शनानिमित्त त्यांनी सध्याच्या आणि भविष्यातील भौगोलिक अडचणी व समस्यांवर भाष्य केले.
खाद्यांनासाठी दुसऱ्या ग्रहाकडे वळण्याची वेळ : पृथ्वीच्या हवामानामध्ये प्रचंड वेगाने बदल घडतोय. पृथ्वी सातत्याने अतिवेगात तापत आहे. पृथ्वीवर अतिशय वाईट रित्या होत असणारा बदल रोखण्यासाठी मानवाने जागृतपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. आज शेतातून मिळणारे खाद्यान्न अपुरे पडत आहेत. याला तोडगा म्हणून, समुद्रातील खाद्यांवर भर दिली जात आहे. येणाऱ्या काळात समुद्रातील माशांना त्यांचे खाद्य समुद्रातच मिळणार नाही मग मासे देखील समुद्रात उरणार नाही ही धोक्याची घंटा असून, पृथ्वीवरील आणि समुद्रातीलही खाद्य संपुष्टात येईल असही देशमुख म्हणाल्या. तसेच, हे सगळं झालं तर माणसाला परत ग्रहावर खाद्यान्न शोधण्यासाठी जावं लागेल अस देखील शुभांगी देशमुख म्हणाल्या.
भूगोल दिनाच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न : 14 जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन भौगोलिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीद्वारे विद्यार्थ्यांसह सर्वांमध्ये सध्याच्या भौगोलिक परिस्थितीबाबत जाणीव जागृती व्हावी यासाठीच प्रयत्न करण्यात आले. जगात कुठे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, भूकंप परिस्थिती कुठल्या भागात निर्माण होऊ शकते आणि अशा संकटाला कसे सामोरे जायचे यासह जमिनीतून योग्य पीक घेणं, जंगल संवर्धन, खनिज संवर्धन यासंदर्भात विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या माहितीपर कलाकृतींद्वारे जनजागृती केली जात असल्याचं देखील प्रा. डॉ. शुभांगी देशमुख म्हणाल्यात.
असे आहे भूगोल दिन साजरा करण्याचे कारण : भारतात भूगोल या विषयाला शास्त्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे भूगोलतज्ञ डॉक्टर सी. डी. देशपांडे यांचा 14 जानेवारी हा जन्मदिवस आहे. 14 जानेवारी 1912 रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. डॉक्टर सी. डी. देशपांडे यांच्या प्रयत्नामुळेच मुंबई विद्यापीठात स्वतंत्र भूगोल विभागाची स्थापना झाली. भूगोल महर्षी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला असून, 14 जानेवारी या त्यांच्या जन्मदिनी भूगोल दिन साजरा केला जातो. योगायोगाने 14 जानेवारीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो यात सूर्याच्या उर्जेचे संक्रमण होते, त्यामुळे ऋतूमध्ये बदल होण्याचा हा दिवस असून या दिवसाला भूगोल विज्ञानामध्ये अतिशय महत्त्व असल्याचंही शुभांगी देशमुख यांनी सांगितलं.
हेही वाचा :
1 अकरावी पास मराठी तरुणाची कमाल; उभा केलाय MBA विद्यार्थ्यांनाही लाजवेल असा 'लॉन्ड्री व्यवसाय'
3 मराठा आरक्षणावरुन बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले 'गाडी अडखळतच'