अमरावती - तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे आज (दि. 28 मार्च) पहाटे अल्पभूधारक शेतमजूर कुटुंबाच्या राहत्या घरात अचानक सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घराशेजारी असलेल्या पाण्याच्या हौदाच्या साहायाने नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
नेहमीप्रमाणे तळेगाव ठाकूर येथील शेतकामात काबाडकष्ट करणारे प्रशांत प्रभुजी गोमासे हे मजूर कुटुंबीय पहाटे 4 वाजेच्या सुमारास उठले आणि गॅस सुरू करताच अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. नागरिक झोपेत असतानाच अचानक स्फोटाच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली व सर्वजण पेट घेतलेल्या गोमासे यांच्या घराच्या दिशेने पळत सुटले. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केले होते.
मात्र, घराशेजारी असलेल्या एका पाण्याच्या हौदातील पाणी नागरिकांनी तत्काळ आगीवर ओतून नियंत्रण मिळविले. मात्र, आगीत गोमासे या मजूर कुटुंबियांचे सर्व संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य जळून खाक झाले होते. आगीची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर घटनेनंतर मजूर कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती येथील उपसरपंच सतीश पारधी यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ याठिकाणी संसारोपयोगी साहित्य व अन्न धान्य मदत स्वरूपात पाठवून आणखी मदत करण्याचे आश्वासन नुकसानग्रस्त कुटुंबियांना दिले.
हेही वाचा - शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव, शस्त्रक्रियेला होतोय विलंब