अमरावती- जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतीतील शेतमाल चोरी गेल्याच्या घटना समोर आल्या आहे. मेहनतीने पिकवलेला शेतमाल चोरून नेणाऱ्या टोळीला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी एकूण आठ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला शेतमाल, एक पीकअप वाहन असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सापळा रचून आरोपींना अटक
अमरावती जिल्ह्यातील खल्ल्यार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका शेतात गंजी लावून ठेवलेले 50 पोती हरबरा चोरून नेल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली होती. तर एक महिन्यांपूर्वी 22 पोते तुरही या चोरट्यांनी लंपास केली होती. दरम्यान चोरी करणारे हे चोरटे अचलपूर परिसरातील असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच हे आरोपी शेतमाल विक्रीसाठी नागपूर येथे जात असल्याची माहितीही त्यांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अचलपूर येथे नाकेबंदी केली आणि आरोपींना अटक केली आहे. यावेळी चोरी गेलेला शेतमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा- मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेला बॉल्कआऊट चीनमुळेच; सायबर हल्ला झाल्याचे उघड