अमरावती- नाताळ व नववर्षाच्या स्वागताला व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यातील पर्यटन क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. त्यात या पर्यटन स्थळी मुक्कामी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही प्रचंड असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) राज्यातील सर्वच रिसॉर्टचे बुकिंग ३१ डिसेंबर पर्यंत फुल्ल झाल्याची माहिती आहे. अमरावतीमधील चिखलदराला पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे.
अनलॉकनंतर पर्यटनस्थळांवर गर्दी
पर्यटनस्थळी सुविधा व्हव्यात व त्यातून आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट सुरू केले आहे. याला पर्यटकांची पसंती मिळत आहे. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने सर्व पर्यटन स्थळे बंद केली होती. त्यानंतर जून महिन्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली.
चिखलदराला पर्यटकांची पसंती
एक सप्टेंबर पासून चिखलदरा मधील पर्यटन सुरू झाले आहे. परंतु एमटीडीसीचे रिसॉर्ट बंद होते. मात्र, आता ऑक्टोबर महिन्यापासून रिसॉर्ट सुरू करण्यात आले आहेत. अशातच आता नववर्षाच्या स्वागतासाठी आणि पर्यटकांनी आपल्या सुट्ट्यांचा बेत आखून या चिखलदऱ्याला भेट देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार चिखलदरा येथील पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टचे बुकिंग सुरू झाले होते. दरम्यान काही दिवसातच येथील बुकिंग फुल झाले आहे. पुणे, औरंगाबाद, कोकण ,नागपूर आणि अमरावती या पाच विभागात असलेले एमटीडीसी चे सर्व रिसॉर्ट हे १००% बुकिंग झाले आहे.दरम्यान कोरोनाचे सर्व नियम पाळून येते पर्यटकांना राहावे लागणार आहे.