अमरावती - विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अवसमरणीय क्षण असतो. तर आपल्या लग्नाचा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी अनेकांनी वेग-वेगळ्या पद्धतीने विवाह केल्याचे आपण पाहिले असतील. त्यासाठी अनेकजण विवाह सोहळ्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे अमरावतीतील सहाय्यक वनरक्षक असलेल्या एका वधू पित्याने अनोख्या पद्धतीने मुलीचे लग्न लावून दिले. त्यासाठी त्यांनी लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना वेगवेगळ्या फळांची तब्बल दीड हजार रोपे वाटली आहेत.
वनविभागात सहाय्यक वनरक्षक असलेल्या अशोक कविटकर यांची मुलगी कल्याणी कवीटकर हिचा आज डॉ. अंकित काळे यांच्यासोबत विवाह झाला. हा विवाहसोहळा तेलाई सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी पार पडला. यावेळी विवाहस्थळी वधू पित्याने 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश देत लग्नासाठी आलेल्या मंडळींना फळरोपांचे वाटप केले.
यावेळी जाम फळाची 1 हजार 100, आंबा 100, सीताफळ 100, आवळा 200 असे एकूण 1 हजार 500 फळ रोपांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कविटकर यांनी पर्यावरण दिनी आपल्या मुलीच्या लग्नात राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.