अमरावती - गोवा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाते. मात्र, अमरावतीच्या नेर पिंगळाई गावच्या मारोतराव इंगळे यांना राज्य सरकारकडून मिळणारी पेन्शन 2013 मध्ये अचानक बंद झाली. आपल्याला मिळणारी पेन्शन बंद का झाली. या नेमके कारण काय. हे विचारण्यासाठी वयाच्या 87 व्या वर्षी मारोतराव गेल्या आठ वर्षांपासून शासकीय कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. पण लाल फितीत अडकलेले प्रशासन मात्र त्यांना उडवा उडवीची उत्तरे देत आहे.
ऐन तारुण्यात घरावर तुळशीपत्र ठेऊन मारोतराव कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून गोवा मुक्ति संग्रामात भरती झाले. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी पोर्तुगीजांच्या गोळ्याही आपल्या अंगावर झेलल्या. पोर्तुगीजांशी झालेल्या याच संघर्षात मारोतरावांच्या पायाला गोळी लागली. गोवा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना राज्य शासनाकडून दरमहा पेन्शन दिली जाते. पण त्यांना मिळणारी ही पेन्शन 2013 पासून बंद झाली आहे.
हेही वाचा - प्रेमविवाह न करण्याच्या 'त्या' शपथ प्रकरणावर प्राचार्यासह प्राध्यापकांचा माफीनामा
स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या एकट्या मारोतरावांचीच अवहेलना सुरू असे नाही. तर अशा अनेक अनेक स्वातंत्र्य सैनिकांची हीच कहाणी आहे. ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. मारोतरावांनी त्यांची ही व्यथा तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सांगितली. पण यावर त्यांना चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तरी आपल्याला न्याय देतील हीच अपेक्षा ठेवून त्यांनी पुन्हा सरकारशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
हेही वाचा - उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी अमरावती-भुसावळ पॅसेंजर रद्द, प्रवाशांची तारांबळ
सरकारे बदलली पण स्वातंत्र्य सैनिकांची अवहेलना मात्र थांबली नाही. मारोतरावांची पेन्शन का आणि कुणी बंद केली यांचे उत्तर मात्र आठ वर्षातही सापडले नाही. सध्या मारोतरावांना केंद्र सरकारची पेन्शन सुरू आहे. नेर पिंगळाई गावातील मध्यवर्ती बँकेत त्यांची पेन्शन जमा होते. राज्य सरकारची पेन्शनही याच बँकेत जमा होते. पण ती आता का मिळत नाही याची माहिती बँक व्यवस्थापकांनाही नाही. तर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार केला. त्यावर त्यांनी चौकशी सुरू असल्याचे शैलेश नवाल यांनी सांगितले.
वयाच्या 21 व्या वर्षी स्वयं स्फुर्तीने गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सरसावले. मात्र, प्रशासनाने केलेल्या अवमानामुळे या स्वातंत्र्य सैनिकाला त्यांनी दिलेल्या योगदानाचा आता पश्चाताप होत आहे. देशासाठी लढणारा सैनिक शहीद झाला की त्याच्या पार्थिवावर पुष्पहार ठेऊन शोक व्यक्त करुन सैनिकांच्या कल्याणाच्या बाता मारायच्या. परंतू आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या या स्वातंत्र्य सैनिकांना मात्र होणारा त्रास काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा कमी नाही.