अमरावती : केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या 75 च्या अमृत महोत्सवानिमित्त ( Azadi Ka Amrit Mahotsav ) ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या अभियानांतर्गत ( Clean India Clean School Campaign ) सन 2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी अमरावती विभागातील चार शासकीय निवासी शाळांची निवड झाली आहे ( Clean School Awards ). यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा तसेच दर्यापूर तालुक्यातील सामदा कासमपूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड - अकोट तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील अनुसूचित जाती-जमातींच्या मुलींची शासकीय निवासी शाळेची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच या शाळेला राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील भंडारी नाथ येथील अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्थांचा ऑनलाईन सहभाग - पुरस्कारासाठी शालेय स्वच्छतेसंबंधी पाच विविध बाबींवर निवड निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण व समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांनी या पुरस्कारासाठी ऑनलाईन सहभाग नोंदविला होता. त्यानंतर निवड समितीने प्रत्यक्ष भेट देऊन शाळांची तपासणी केली. यामध्ये पाणी, साबणाने हात स्वच्छ करणे, सुयोग्य वर्तणूक, कार्यक्षमता सुधार, स्वच्छता गृहे, देखभाल, दक्षता, कोविड नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे, संबंधित छायाचित्रे या बाबींवर प्रश्नावली व प्रत्यक्ष पाहाणी करण्यात आली. यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सर्वसाधारण श्रेणीमधून 8 शाळांची तर उपश्रेणीमधून 30 शाळांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांची शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी - अमरावती विभागात समाज कल्याण विभागाच्या एकूण 26 शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळा सुसज्ज शासकीय इमारतीत आहेत. येथील विद्यार्थ्यांना भोजन, निवास तसेच सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येतात. यामध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुम, अत्याधुनिक विज्ञान केंद्रे, निसर्गरम्य व अभ्यासपूरक वातावरण, ग्रंथालय, क्रीडांगण, व्यायामशाळा यासारख्या सुविधा प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पुरविण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचीच परिणती म्हणून स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी या शाळांची निवड झाली आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे. यासाठी त्यांनी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.
हेही वाचा - Sanjay Raut In Arthur Road Jail: शिवसेनेच्या नेत्यांना संजय राऊतांना भेटण्यास जेल प्रशासनाचा नकार