अमरावती - काही दिवसाआधी शेकदरी–गव्हाणकुंड बीट क्षेत्रात भेमडी गावानजीक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालानुसार बिबट्याच्या शरीरावर घाव आढळल्याने वनविभागाने चौकशी सुरू केली. यामध्ये भेमडी गावातील आदिवासी लोकांची वनविभागामार्फत चौकशीच्या निमित्ताने निर्दोष आदिवासी बांधवांना रात्री-अपरात्री घरी येऊन घराची झडती घेणे, धमकावणे, घरातून उचलून नेऊन मारहाण करून सळो की पळो करून सोडले आहे. याप्रकरणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिलांना, युवकांना, वृद्धांना धाक धपट करून गावातील आदिवासी नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
कुटुंबाला भेटण्यासही मनाई
या प्रकरणात गावातीलच दोन आदिवासी मुलांना सेन्ट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले व गावातीलच रंक्षु युवनाते नामक व्यक्ती कामानिमित्त गेल्या दोन महिन्यापासून गोंदिया येथे गेलेला असता गावात आल्यानंतर लगेच वनविभागाने त्याला उचलून नेऊन छळ सुरू केला आहे. त्याला परिवारास भेटण्यास वन खात्याच्या कार्यालयात गेले असता त्यांना भेटूसुद्धा देण्यात येत नाही.
'...तर तीव्र मोर्चा'
वरुड तालुक्यातील आदिवासी बांधवांचा अभयारण्याला व संरक्षित वनाला विरोध असून सर्व आदिवासी बांधव वंशपरंपरेणे त्या जागेवर राहत असल्यामुळे त्यांचा जंगलावर, तेथून मिळणाऱ्या तेंदू पत्ता, मोह यावर अधिकारी आहे. हा भाग वन संरक्षित होताच वनविभागाकडून आदिवासी बांधवांना छळणे सुरू केले आहे. हे थांबले जावे. नाहीतर संपूर्ण जंगलाचे नियम तोडून वनविभागाच्या कार्यालयावर तीव्र मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बोंडे यांनी दिला आहे.