अमरावती - जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या चिरोडीच्या जंगलातील वन संपत्तीच्या रक्षणासाठी नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेतली जात आहे. २ दिवसांपासून राज्य राखीव पोलीस दलाचे १ बंदुकधारी पथक चिरोडीच्या जंगलात तैनात केले आहे. यानिमित्ताने जंगलात काठेवाडी आणि मेंढपाळांच्या जनावरांच्या घुसखोरीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न वनविभागाच्यावतीने केला जात आहे.
अमरावती जिल्ह्यात मेळघाटनंतर वडाळी, पोहरा आणि चिरोडीचे जंगल हे समृद्ध जंगल म्हणून ओळखले जाते. चिरोडीच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून काठेवाडी लोकांची वसाहत आहे. काठेवाडी समुदायाच्या शेकडो गायी या जंगल क्षेत्रात चरण्यासाठी सोडल्या जातात. त्यासोबतच विविध भागातून स्थलांतरित होणारे मेंढपाळ आपल्या मेंढ्या, बकऱ्या चराईसाठी चिरोडीच्या जंगलात सोडतात. यामुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाला गेल्या अनेक वर्षापासून या संकटाचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा - रुख्मिणीच्या माहेरघरातील कुलस्वामिनी अंबिकादेवीला ११५१ अखंड ज्योतीचा संकल्प
गतवर्षी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काठेवाडींना जंगलात जनावरे सोडण्यास हटकले होते. यावर काठेवाडींनी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. यावर्षी विविध वृक्षांची लागवड जंगलात करण्यात आली असल्याने चिरोडीचे जंगल चांगलेच बहरले आहे. जंगलाचे संरक्षण व्हावे तसेच वन्यप्राण्यांना याभागात मुक्त संचार करता यावा यासाठी जंगल भागात पाळीव जनावरांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना काठेवाडी आणि मेंढपाळ आपली जनावरे जंगलात सोडत आहेत.
हेही वाचा - हॉटेलच्या गच्चीवरून उडी मारून युवतीची आत्महत्या
काठेवाडी आणि मेंढपाळांच्या या कृत्याला आळा बसावा यासाठी शासनाने वनविभागाच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दल नागपूर गटाची एक तुकडी तैनात केली आहे. उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे आणि चांदुर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान जंगलात गस्त घालत आहेत. यामुळे जंगलात जनावर चराई करणाऱ्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला असल्याची महिती चिरोडीचे सहायक वन परिक्षेत्र अधिकारी एम. के. निर्मळ यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी बडनेऱ्यात सभा घेऊन माझ्या विरोधात बोलून दाखवावे - आमदार रवी राणा