अमरावती - पुढील वर्षाच्या ऑगस्टमध्ये अमरावतीच्या विमानतळावरुन पहिले विमान उड्डाण भरेल, असे आश्वासन खासदार नवनीत राणा यांनी दिले. बेलोरा येथील अमरावती विमानतळाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हे विमानतळ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे नागरिकांच्या आशा परत एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम झपाट्याने सुरू आहे. १८ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या लोकसभेच्या सत्रात अमरावती विमानतळाच्या कामासंदर्भात विषय मांडता यावा, यासाठी खासदार नवनीत राणा यांनी विमानतळाच्या कामाची पाहणी केली. १८७२ मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम जोमात सुरू असून, येत्या काही दिवसात टर्मिनलच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - आमदार रवी राणांचा व्हिडिओ व्हायरल,शरद पवारांना केली भाजपला पाठिंबा देण्याची विनंती
खासदार नवनीत राणा यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केल्यावर अमरावतीकरांसाठी ऑगस्ट महिन्यातच विमानसेवा सुरू होईल अशी ग्वाही दिली. खासदार म्हणून मी सभागृहात अमरावती विमानतळाचा प्रश्न पोटतिडकीने मांडला केंद्रीय मंत्री हार्दिक पुरी यांनी अमरावती विमानतळाच्या कामासाठी कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार राणा यांनी सांगितले.
हेही वाचा - मुलाच्या लग्नानिमित्त दिली संपूर्ण गावाला मायेची ऊब; गावकऱ्यांशी जपले ऋणानुबंध
येत्या काही दिवसात अमरावती विमानतळाचे काम पूर्ण होईल. ऑगस्ट महिन्यात अमरावतीवरून मुंबईसाठी विमान आकाशात निश्चितपणे झेपावेल. अमरावती विमानतळावर एकाच वेळी दोन विमान उभे राहू शकतील, अशी व्यवस्था केली जाणार असल्याचेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.