अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे एका टँकरचालकाला (वय 60) कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा कोरोनाबाधित टाकरखेडा रस्त्यावरील नामांकित पेट्रोल पंपावरील टँकरचालक म्हणून कामास आहे.
हा टँकरचालक गेल्या 10-12 दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे तो कामावरून बंद होता. त्याची तब्येत बरी नसल्याने परतवाडा येथील एका नामांकित रुग्णालयात चार-पाच दिवस भरती होता. त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने संबंधित या रुग्णाला अमरावती येथे भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत अंजनगाव सुर्जी शहरात एकही कोरोनाबाधित आढळला नव्हता. मात्र, आता अंजनगाव शहरात कोरोनाचा प्रवेश झाल्याने येथे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, 21 जूनला सायंकाळी तहसीलदार विश्वनाथ घुगे, ठाणेदार राजेश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डोंगरे, पोलीस निरीक्षक विशाल पोळकर, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, नगर परिषद अभियंता ठेलकर, आरोग्य अधिकारी वाटाणे यांनी तातडीने काजीपुरा भागात भेट दिली. तसेच संबंधित भाग सील करणे सुरू केले आहे. या भागातील नागरिकांची तपासणी होणे सुद्धा गरजेचे आहे.
हेही वाचा - आता मुख्य लक्ष्य मृत्यूदर कमी करण्याकडे - डॉ. शशांक जोशी
परतवाड्यातील रुग्णालयाची तपासणी सुद्धा गरजेचे -
अंजनगाव सुर्जी येथील हा कोरोनाबाधित व्यक्ती कोरोना अहवाल येण्यापूर्वी उपचाराकरिता परतवाडा येथील एका नामांकित डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होता, अशी चर्चा आहे. प्रशासनाने याबाबत चौकशी करावी. तसेच शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने आतातरी प्रशासनाने कडक कारवाई सुरू करावी, या मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.