अमरावती - शहरातील गुलिस्तानगर येथे बुधवार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून एका युवकावर गोळीबार तसेच तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत फिरोज ऊर्फ नच्छू हा युवक जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला, फिरोज ऊर्फ नच्छू याचा दुपारी साडेतीनच्या सुमारास असोरिया पेट्रोलपंपजवळ काही युवकांशी वाद झाला होता. त्यावेळी एकमेकांना पाहून घेण्याची भाषा बोलण्यात आली. यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फिरोज ऊर्फ नच्छू हा बेस्ट हॉस्पीटलच्या मागे उभा होता. यावेळी एका कारमधून चार युवक आले. त्यापैकी एकाने फिरोज याच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. तर अन्य हल्ले खोरांनी तलवारीने हल्ला चढविला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; अमरावती, वर्ध्यात संचारबंदी लागू
या भागात फोफावलीये गुंडागिरी -
गुलिस्तानगर हे गाडगेनगर व नागपुरीगेट पोलीस ठाण्याच्या सीमेवर आहे. या भागात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. लहानसहान कारणावरून झालेले वाद विकोपाला जाऊन तेथे गुंड प्रवृत्तीचे युवक एकमेकांच्या जिवावर उठतात. अशाच पद्धतीच्या वादातून बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गुलिस्ता नगरात गोळीबार झाल्याची घटना घडली.