अमरावती - चांदुर रेल्वे-अमरावती रोडवरील ढोले कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या अंबिका हॉटेलच्या किचन रूममधील गॅस सिलेंडरला सोमवारी दुपारी ३ वाजता आग लागली. यामध्ये किचन रूम मध्ये १ सिलेंडर जळाला असून २ सिलेंडर रिकामे असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
चांदूर रेल्वे शहरातील ढोले कॉम्पलेक्समध्ये समोरील बाजूस राजुरकर यांचे अंबिका हॉटेल आहे. ढोले कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस विजय भूत यांचे निवासस्थान आहे. त्यांनी अमरावती रोडच्या बाजूने रिकामी खोली अंबिका हॉटेलला खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी दिली होती. याठिकाणीच ही घटना घडली आहे. या आगीत खाद्यपदार्थ तयार करण्याचे साहित्य जळून गेले आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
आगच्या ठिकाणी लागली त्या रुमला लागूनच डॉ. क्रांतिसागर ढोले यांचे हॉस्पिटल आहे तर वरच्या मजल्यावर विद्युत मंडळाचे तालुका कार्यालय आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्समधील दुकानाला आगीची झळ पोहचताच इतर दुकाने बंद करण्यात आली होती. आग लागल्याच्या अर्ध्या तासानंतर धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येऊन संपूर्ण आग आटोक्यात आणली.
आग लागली त्यावेळी डॉ. क्रांतिसागर ढोले यांच्या रूग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत होते. मात्र, आगीची माहिती मिळताच भरती केलेले रुग्ण सलाईनसह बाहेर काढण्यात आले.