अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर शहरातील श्रीकृष्ण पुलाजवळ जुन्या वैमन्यस्यातून झालेल्या तुफान राड्यात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
दोन गटात झालेल्या या वादात ६ जण गंभीर जखमी झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री अचलपूर येथील समरसपुरा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या श्रीकृष्ण पुलाजवळ दुचाकी गाडीचा वेग कमी करण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात ही हाणामारी झाली.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. दोन किरकोळ जखमींवर अचलपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या घटनेत दोघांना जबर मारहाण करून फॅक्चर करण्यात आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून पोलीस पुढील चौकशी करीत आहे.