अमरावती - येथील मेळघाट वनपरिक्षेत्रातील केकदाखेडा गावात इ-वन वाघिणीने एका ८ वर्षीय आदिवासी बलिकेवर हल्ला केला होता. आता याच वाघिणीने एका म्हशीवर हल्ला करत तिला ठार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, दुधाचा व्यवसाय करणाऱ्या एका पशुमालकावर सुद्धा हल्ला चढवण्याचा प्रयत्न वाघिणीने केला. मात्र, त्यांनी आपल्या म्हशीच्या कळपाचा आधार घेतला. त्यावेळी आपल्या मालकावर वाघिण हल्ला करत असल्याचे पाहून सर्व म्हशींनी एकत्र येऊन वाघिणीला पिटाळून लावले होते.
मात्र, काही वेळात परत म्हशीच्या बछड्यावर वाघिणीने झडप घेतली. तेव्हा म्हशीने वाघावर प्रतिहल्ला केला. दरम्यान, वाघ आणि म्हशीच्या या झुंझीत म्हैस ठार झाली. तर काही बछडे गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी १ वाजण्च्याया सुमारास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात कवडा झीरी नजीकच्या जामोद येथे हा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी जंगलातून मेळघाटच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत डोलारा जंगलात १५ दिवसांपूर्वीच या २ वर्षीय वाघिणीला सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर १५ दिवसांमध्येच या वाघिणीने आधी एका गायीची शिकार केली. त्यानंतर एका आठ वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला. आता पुन्हा एका म्हशीला ठार केल्याने या वाघिणीच्या दहशती बद्दल कमालीचा संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.