अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात चार ते पाच दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाबरोबर गारांचा वर्षाव झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावल्याचे चित्र मोर्शी तालुक्यात बघायला मिळत आहे.
मोर्शी तालुक्यात २ जानेवारीला सकाळी बराच वेळ गारांचा पाऊस सुरू होता. तालुक्यातील शेतकरी आधीच संकटात असून पुन्हा दुखावणारा अवकाळी पाऊस जोरदार वारा व गारपीट घेऊन आला. त्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगाम अवकाळी पावसाने हिरावला. त्यात रब्बी पिकांना नुकसानकारक ठरणाऱ्या पावसाने सुरुवात केल्याने पिकांचे नुकसान होते की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच तूर, कापूस, गहू व इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत.
मोर्शी, वरुड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. त्याचबरोबर, जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी आज दिले. त्याचबरोबर, मोर्शी, वरुड तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याचा आढावा आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला.