अमरावती - पावसाळा सुरू झाला की खरीप पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज होतात. त्यामुळे रविवारी (१६ जून) दुपारी तिवसा येथील महादेव लॉन येथे शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खरीप हंगामपूर्वी शेतीबद्दल उपाययोजना आणि त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. त्यासोबतच जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे, तिवसा तालुका कृषी अधिकारी रमेश चुळे आदी उपस्थित होते. यावेळी शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कीटकनाशक फवारणी जनजागृतीसाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते किट देण्यात आली.
खरीप हंगामा पूर्व नियोजन, बीजप्रक्रिया, किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, नवीन तंत्रज्ञान वापरून कापूस पिकाची लागवड, सोयाबीन पिकांची लागवड, तण व्यवस्थापन, कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. या कार्यशाळेत शेती आणि पिका बद्दल विविध प्रकारचे स्टॉल लागले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.