अमरावती - वर्षभर तिन्ही ऋतूत आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राब राब राबणाऱ्या सर्जा-राजाचा पोळा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. बैलांना नटवण्यासाठी लागणारे घुंगरू, झाल, दोरी नाथे इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी सजलेल्या बाजारपेठेत शेतकरी गर्दी करताना दिसत आहे.
या वर्षी निसर्गाने शेतकऱ्याला बऱ्यापैकी साथ दिली असल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा व बैलाचा महत्वापूर्ण सण म्हणून ओळखल्या जाणारा पोळा सण मोठया उत्साह साजरा होत आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बैलपोळ्याच्या खरेदीला शेतकऱ्यांकडून सुरुवात करण्यात आली. शहरासह तालुक्यातील बाजारपेठेत आजूबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांनी आज खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. संपूर्ण बाजारपेठ आज बैलांच्या साज-सामानाने सजली असून लहान मुलांच्या मातीच्या बैलाची दुकाने सजल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे, शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण समजला जातो. बाजारपेठेत घुंगरू, झालर, दोरी, नाथे, कवळी या वस्तू दाखल झाल्या आहेत तर शेतकऱ्यांची हे सामान खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
भारतीय संस्कृतीनुसार श्रावणात सण, उत्सवाची उधळण होत असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांच्यासह पोळा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्यानिमित्त तिवसा शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत त्यामध्ये बैलांसाठी निरनिराळे गोंडे, मातीचे बैल, आणि घुंगुरुच्या माळानी दुकाने सजली आहेत.