अमरावती - एकीकडे निसर्गाच्या दृष्ट चक्रामुळे संत्रा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात कृषी विभागाकडून मिळणारे मार्गदर्शनही तोडके असल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीन भर पडते. अशातच अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची भिस्त नागपूरच्या शास्त्रज्ञांवर होती. त्या शास्त्रज्ञांनीही संत्रा पिकाला तुमची जमीन योग्य नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र, त्या शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जिद्दीने व मेहनतीने संत्राच्या बागा फुलवल्या आहेत.
शास्त्रज्ञांनी संत्र्यासाठी जमीन योग्य नसून झाडे तोडून दुसरे पीक घेण्याचा दिला सल्ला
येथील अनेक शेतकर्यांकडे हजारो संत्र्याची झाडे आहेत ते योग्य पद्धतीने झाडाची निगा राखतात. वेळोवेळी फवारणी करतात. तरीही झाडांना कीड लागणे, फळांना गळती लागणे, फळांचा आकार छोटा राहणे अशा विविध प्रकारच्या समस्यांना त्यांना सामना करावा लागला होता. याबाबत त्यांनी नागपूर येथील एनआरसीच्या शास्त्रज्ञांना माहिती दिली. शास्त्रज्ञांनी नागपूरहून शिरसगाव अर्डक गाठून परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागेत जाऊन भेटी दिल्या व झाडाची पाहणी केली. यापैकी अनेक संत्रा बागेत जाऊन तुमची जमीन संत्रा उत्पादन घेण्यास योग्य नसून संपूर्ण झाडे तोडण्याचा अजब सल्ला दिला होता. मात्र या शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्यामुळे घाबरून न जाता या शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे ठरवले व एकमेकांशी सल्ला-मसलत करून शास्त्रज्ञांनी नाकारलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी जिद्दीने संत्र्याची यशस्वी शेती सुरू केली आहे. या संत्र्याच्या माध्यमातून ते लाखो रुपयांचा उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांच्या मेहनत व जिद्दीपुढे नागपूर येथील शास्त्रज्ञांचा अंदाज अखेर खोटा ठरला आहे.
माणूस आपल्या मेहनतीने व जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो. आपली उपजीविका भागवण्यासाठी खडकाळ जमिनीतदेखील हिरवळ तयार केल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार अमरावती जिल्ह्यातील शिरजसगाव अर्डक येथील तीन शेतकऱ्यांनी करून दाखवला आहे.
शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांचे खच्चीकरण
शेतकऱ्यांना योग्य सल्ला देण्याऐवजी खच्चीकरण करण्याचे काम नागपूर येथील संशोधकांनी केले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मात्र, शास्त्रज्ञांच्या अभ्यासाच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांची मेहनत कामी आल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली संत्रा बागेला भेट
शिरजगाव अर्डक येथील शेतकऱ्यांनी एकमेकांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या संत्रा शेतीची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. अफाट मेहनतीवर घेतलेले लाखोंचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या संत्रा बागेत जाऊन भेटी देतात. तसेच, शेतकरी नेते बच्चू कडू यांनी देखील या संत्रा बागांना भेटी दिल्या आहेत.