अमरावती - भातकुली तालुक्यात येणाऱ्या बैलमारखेड गावात ग्रामस्थांच्या शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेने झोपडी बांधून कुंपण घालत आतिक्रमण केले आहे. या महिलेच्या या अतिक्रमाणामुळे या मार्गावरून जाणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विषेश म्हणजे सदर महिलेला शासनाकडून घरकूल बांधून मिळाले असतानाही तिने केलेल्या या प्रतापामुळे गावातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्रिवेणी गजानन डोंगरदिवे असे त्या महिलेचे नाव आहे.
त्रिवेणी डोंगरदिवे ही महिला मुलासह महेर असणाऱ्या बैलमारखेड गावात राहत असून तिला शासनाकडून या गावात घरकुलही मिळाले आहे. घरकुल मिळाले असतानाही तिने ग्रामस्थांच्या शेतीचा मार्ग अतिक्रमण करून बंद केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तसेच भातकुलीच्या तहसीलदारांकडे तक्रार देऊनही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनीच गावातील शेतकऱ्यांच्या अडचणींची दाखल घ्यावी, अशी मागणी बैलमारखेडातील या शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत गावचे माजी पोलीस पाटील रमेश बंजारी, सतीश बैलमारे, नंदकिशोर पुंडकर यांनी' ईटीव्ही भारत'ला याची माहिती दिली. तसेच जिल्हा प्रशासनाने आपली जबाबदारी झटकणाऱ्या ग्रामपंचायतवरही कारवाई करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.