अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथे राहणाऱ्या भास्कर राजणकर या वृद्ध शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून नदीत उडी मारून आत्महत्या केली.
असमाधानकारक पाऊस असून देखील यावर्षी थोडे फार उत्पन्न होईल, या आशेपोटी भास्कर राजणकर यांनी कशीबशी आर्थिक तडजोड केली. यातून त्यांनी ५ एकर शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके करपली. हे पाहून त्यांनी वर्धा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. भास्कर राजनकर यांच्यावर सोसायटीचे व उसनवारी असे एकूण १ लाख रुपयांचे कर्ज होते. याही वर्षी कर्जाची बाकी शून्य करता येणार नाही या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. भाष्कर राजनकर यांच्या मृत्यूने त्यांच्या परिवारावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.