अमरावती - अनेक ठिकाणी मुलीच्या जन्मल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. कुठे बँड बाजा, कुठे मिरवणूक, तर कुठे मोठे सोहळे केले जातात. मात्र, अमरावतीत एका कुटुंबाने रक्तदान करून मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील वलगावात मदने कुटुंबीय राहते. या कुटुंबात एका कन्यारत्नाने गेल्या १७ तारखेला जन्म घेतला. मुलगी झाली म्हणून नाराज होणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यातच मुलगी झाली म्हणून तिचे स्वागत करणारे देखील खूप आहेत. त्यामधील असणाऱ्या या मदने कुटुंबाने देखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने मुलीच्या जन्माचे स्वागत केले.
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कुटुंबातील ११ सद्स्यांनी रक्तदान करत मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त केला. कुठलीही भिती न बाळगता महिला सदस्यांनी देखील रक्तदान केले आणि समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला.