अमरावती- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात असलेल्या लॉकडाऊनचा फटका हा सर्वांना बसला आहे. यामधून माजी सैनिकही सुटले नाहीत. मागील काही महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेले अमरावती मधील आर्मी कॅन्टीन आज सुरू करण्यात आले आहे. या कॅन्टीनमधून साहित्य नेण्यासाठी माजी सैनिकांची मोठया प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि प्रशासनाकडून बसण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने वृद्ध माजी सैनिकांची गैरसोय झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्मी कॅन्टीन बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आज सकाळपासून पुन्हा कॅन्टीन सुरू करण्यात आले होते. माजी सैनिक हे ५५-६० वर्षावरील असून ते १००-१५० किलोमीटरचा प्रवास करून तेथे आले होते. आर्मी कॅन्टीनच्या वतीने उठण्या-बसण्याची सोय करण्यात आली नव्हती. माजी सैनिकांना सकाळपासून गेटच्या बाहेर रांगेत उभे राहावे लागले असल्याने त्रास सहन करावा लागला आहे.
कॅन्टीनच्या बाहेर माजी सैनिकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. माजी सैनिकांना गेटबाहेर उभे केल्याने सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाले. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता माजी सैनिकांनी व्यक्त केली आहे. कॅन्टीन सुरू करण्यात आले असल्यामुळे परिसरातील रिकाम्या जागेवर माजी सैनिकांना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून रांगेत उभे का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.