अमरावती- जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शहरी भागात जास्त आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयावर देखील मोठा ताण वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना घरीच होम आयसोलेशन करून उपचार केले जात आहे. दरम्यान या कोरोना बाधित रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी व आरोग्य विषयक सल्ला देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने सुसज्ज अशी एक अत्याधुनिक वॉररूम तयार केली आहे. या रुमच्या माध्यमातू तीन हजार रुग्णावर लक्ष ठेवले जाणार आहे.
वॉररुमच्या माध्यमातून कोरोना रुग्णांशी संवाद
अमरावती काही दिवसांपासून कोरोनाचा नवा हॉसपॉट बनली आहे. दर दिवसाला अमरावती जिल्ह्यात ८०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून येत असल्याने अमरावतीसह अचलपूर शहर व अन्य नऊ गावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊनदेखील लावण्यात आला आहे. परंतू रुग्णसंख्या मात्र, कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे सरकारी आणि खाजगी रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांची गर्दी होत आहे. तसेच अनेक कोरोनाबाधित घरीच होम आयसोलेशन होऊन उपचार घेत आहे. या कोरोना बधितांवर लक्ष ठेवण्यासाठी आता महानगरपालिकेने आता एक अत्याधुनिक अशी एक वॉररूम तयार केली आहे. .या रुमच्या माध्यमातून सतत कोरोना रुग्णांशी फोनद्वारे संवाद साधला जात आहे. तसेच त्यांना नियम पाळण्याचे आवाहनही कऱण्यात येत आहे.
नियम मोडल्यास दंड
अमरावती शहरात सध्या तबल तीन हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित हे होम आयसोलेशन होऊन उपचार घेत आहे. होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांना १४ दिवस बाहेर फिरण्यास महानगरपालिकेने बंदी घातली आहे. तसेच ही संबिधित व्यक्ती कोरोनाबाधित आहे हे लोकांना माहीत व्हावे यासाठी कोरोना बधितांच्या घरावर होम आयसोलेशनचे फलक लावण्यात आले आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या या वॉररूममधून कोरोनाबाधित रुग्ण खरच घरी आहेत का ते बाहेर फिरतो याची पडताळनी केली जाणार आहे. जे कोरोनाबाधित होम आयसोलेशनचे नियम पाळणार नाही अशा रुग्णांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
महापालिकेच्या उपक्रमाचे अमरावतीकरांकडून कौतुक
अमरावती महानगरपालिकेने तयार केलेल्या या वॉररूममूळे एकाच वेळी एकाच ठिकाणाहून तीन हजारपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कमी कर्मचाऱ्यांची आणि कमी वेळात महानगरपालिकेचे हे काम पार पडणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे अमरावतीकरांनी कौतुक केले आहे.