अमरावती - डायट नावाने ओळखली जाणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्चपासून पाच महिन्यांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
1995पूर्वी डी. एड्. कॉलेज व शिक्षक प्रशिक्षणाची जबादारी असणाऱ्या डायटकडे 2015च्या शिक्षण विभागातील बहुतांश कारभार डायटकडे आला आहे. कोविड काळात एप्रिलपासून शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र, तंत्रस्नेही प्रशिक्षण, सरपंच परिषद, शाळा व्यवस्थापन प्रशिक्षण, बालहक्क आदी अनेक विषयांचे प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. तरीही येथील प्राचार्य आणि इतर अधिकारीस, कर्मचऱ्याना मार्च महिन्यापासून वेतन मिळाले नाही. मार्च महिन्याचे अर्धे वेतन मिळाल्यानंतर काही अपवाद वगळता अनेक अधिकारी व कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत.
कार्यालयात नियमित काम करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधात अधिकारी आणि कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत असल्याचे डायटचे प्राचार्य प्रशांत डवरे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले, की आमच्यासह राज्यातील डायटचे अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दुः ख समान आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना जर कोरोना झाला तर उपचार करण्यासाठीही पैसे नाहीत. एखाद्या कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर जबाबदार कोण असेल, असा सवालही प्राचार्य प्रशांत डवरे यांनी उपस्थित केला.