अमरावती- शहराच्या विकासाला गती येण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील 15 ते 20 टक्के मालमत्तेवर कर आकारणीच झाली नसल्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत समोर आले. यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरुन शहराच्या विकासासाठी महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर देण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. यावेळी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त संजय निपाणे, महापौर संजय नरवणे, मिलिंद चिमोटे, सुनील काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील अनेक नव्या मालमत्तेवर कर आकारणीच झाली नसल्याची धक्कादायक बाब यावेळी समोर आली. नवीन बांधकाम करणाऱ्यांच्या मालमत्तेचा नकाशा मंजूर होतो, त्यांना नळ आणि वीज पूरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, या मालमत्तेवर कर आकारणीच केली जात नसल्याची माहिती बैठकीत समोर आली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आयुक्तांनी सकाळी 9 ते रात्री 9 वाजे पर्यंत कार्यलयात बसून मालमत्ता कर कसा वाढेल यादृष्टीने मार्ग काढायला हवे असे पालकमंत्री म्हणाले.
महापालिकेचे वार्षिक उत्पन्न 360 कोटी रुपये आहे. आयुक्तांनी योग्य नियोजन केले तर जो मालमत्ता कर मिळत नाही तो सुध्दा महापालिकेच्या तिजोरीत येऊन 30 ते 35 कोटी रुपयांची वाढ सहज शक्य आहे. येत्या 15 दिवसात मालमत्ता कर वाढीसाठी प्रयत्न झालेले दिसायला हवे असे पालकमंत्री म्हणाले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात चार हजार कुटुंबांना सदनिका मिळाल्या आहेत. तर रमाई आवास योजनेचा लाभ चार हजार कुटुंबांना मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे शक्य झाले असून 25 ऑगस्टला सदनिका आणि घरकुल मिळणाऱ्या व्यक्तींना प्रमानपत्र वितरित केले जाणार असे पालकमंत्री म्हणाले.