अमरावती - राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक संचार बंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदी दरम्यान एसटी सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी अमरावती जिल्ह्यातीस कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हा अंतर्गत एसटी सेवा पूर्णपणे बंद केली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीची सेवा सुरू राहणार आहे. मात्र, अमरावतीच्या बसस्थानकात अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांची बस अभावी तारांबळ उडत आहे. यातील काही कर्मचारी यवतमाळ, परतवाडा तर काही चांदूरबाजार येथे जाणारे असतात.
प्रवासी पूर्ण झाल्यावर सोडल्या जातात बस -
एसटी बसमधील प्रवासी संख्या पूर्ण झाल्यानंतरच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस सोडल्या जातात. त्यामुळे पूर्ण प्रवासी येईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.
एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा तोटा -
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची वाहतूक सेवा शासनाने 'ब्रेक द चेन'मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून अमरावती मध्यवर्ती बसस्थानकावर दाखल झालेल्या प्रवाशांना काल बाहेर काढण्यात आले होते. आज पुन्हा अनेक प्रवाशांनी बसस्थानकामध्ये गर्दी केल्याचे चित्र पाहत पहायला मिळाले. अमरावती जिल्ह्यातील एसटी बस सेवा बंद केल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.