अमरावती- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 'जणआशीर्वाद' यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. या यात्रेसाठी करोडो रुपये खर्च होत असताना मात्र जिल्ह्याच्या तिवसा येथील कार्यक्रमासाठी चक्क वीज चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीज चोरी केल्यास सामान्य नागरिकावर कारवाई होते. मात्र आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकांवर महावितरण कंपनी वीज चोरीचा गुन्हा दाखल करणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौकात ही सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर ध्वनी यंत्र व रोषणाई करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी लागणारा विद्युत प्रवाह हा मुख्य लाईनवरून दोन ठिकाणी विद्युत प्रवाह जोडून अनधिकृत रित्या घेतल्याचे समोर आले आहे. ज्या जिवंत विद्युत तारांवर हे वायर टाकण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणावर करंट असतो. त्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.