अमरावती - साहेब आम्ही गरीब आहोत... आमची परिस्थिती नाही... त्यामुळे आम्ही सध्या तुमचे पूर्ण वीजबिल भरू शकत नाही. पण एक पर्याय आहे. आमचे सौभाग्याचे लेणे असलेले हे मंगळसूत्र घ्या आणि ते गहाण ठेऊन त्याचे पैसे तुम्ही घेऊन आमचे बिल भरून टाका, पण आमच्या घरची वीज कापू नका, अशी आर्त हाक अमरावतीमधील महिलांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घालत अनेक महिला आपल्या गळ्यातील मंगळसूत्र घेउन थेट वीज वितरण कार्यलयात पोहोचल्या होत्या. पाहुया एक स्पेशल रिपोर्ट...
हेही वाचा - रायगड; कोरोना काळातील वीजबिल माफ करा; जनशक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लॉकडाऊनमुळे अधिक हाल
लॉकडाऊन काळात महावितरणने राज्यातील लोकांना भरमसाठ बिले दिली खरी, पण ती बिले भरताना आता मात्र सर्वसामान्य जनता किती वेठीस धरली जात आहे, याचे जिवंत उदाहरण हे आता अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावात पाहायला मिळाले. मोझरी गावातील सविता इंगोले यांची परिस्थिती म्हणजे हातावर येईल तेव्हा पोटात जाईल. पती पूर्वी बँड वाजवायचे काम करत. पण कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. दिवसभर भर उन्हात दोघेही जंगलाने फिरत झाडे जमा करायची आणि मग त्याचे झाडू बनवून विकायची. मग त्यातून कुटुंब चालव. परंतु तो व्यवसायसुद्धा कमी झाल्याने परिस्थिती कठीण झाली. त्यातच डोळे पांढरे करायला लावणाऱ्या साडे पंधरा हजारांच्या बिलाचा कागद पाठून या इंगोले कुटुंबाला महावितरणने शॉक दिला.
लाइट बंद न करण्याची मागणी
लाईट कापू नये म्हणून १६ मार्चला साडे चार हजार भरले. उरलेले ११ हजार आता भरायचे आहेत. पण परिस्थिती नाही म्हणून शेवटी साहेब हे मंगळसूत्र गहाण ठेवा, पण आमच्या घरची लाइट बंद करू नका, असे म्हणत सविताबाई इतर महिलांना घेऊन थेट महावितरणच्या कार्यालयात पोहोचल्या. यावेळी युवा संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
हेही वाचा - वीजबिल माफीसाठी पुणे-बेंगलुरु महामार्ग रोखला,10 किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा
अनेक कुटुंबांची परिस्थिती हलाखीची
ही कहाणी एकट्या सविता बाईंवर थांबत नाही, तर हीच परिस्थिती राज्यातील हजारो कुटुंबांची आहे. याच मोझरी गावातील शोभा हिवराळे यांचे लहानसे घर. साधा कुलरही नाही, पण महावितरणने बिल दिले १० हजारांचे. त्यातील 3 हजार भरले. आता सात भरायचे कसे, धुणी-भांडी करून चार पैसे कमावणाऱ्या एकट्या शोभाबाईंच्या पतीचे निधन झाले. मुलगी बाळंतीण झाल्याने २ महिन्याचे चिमुकले बाळ घरात राहते. पण महावितरणला याचेही भान राहिले नाही. आधी सरकारने वीज बिलात सूट देण्याच्या घोषणा केल्या, नंतर मात्र सरकारने माघार घेतली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची बिल भरायची परिस्थिती नाही. त्यामुळे वीज कापली जाऊ लागली.