अमरावती - शेतातून कामकाज आटोपून घराच्या रस्त्याने परत येणाऱ्या बैलगाडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या डीपीतील विद्युत प्रवाह अचानक संचारला. त्यामुळे एका बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर गाडीतील 2 शेतमजूर व एक बैल सुदैवाने बचावले. जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरखेड शिवारात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हे वाचलं का? - कोपरखैरणेत विद्युत वाहिनीच्या वायरमध्ये स्पार्क होऊन तरुण भाजला
अनिल पुरुषोत्तम बोके यांचे वरखेड शिवारात शेत आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे शेतमजूर हे बैलगाडीने शेतात कामाला गेले होते. दिवसभराचे कामकाज आटोपून ते परत येत होते. त्यावेळी उंबरखेड कॅनॉलजवळ एका डीपीचा विद्युत प्रवाह पावसामुळे गटारमय झालेल्या रस्त्यामधून सर्वत्र संचारला होता. त्यावेळी शेतमजूर श्यामलाल ताटे व देवदास धुर्वे हे बैलगाडी घेऊन जात असताना अचानक डीपीतील विद्युत प्रवाह गाडीत संचारला. यामध्ये बोके यांचा 50 हजार रुपये किमतीचा धिप्पाड बैल जागीच गतप्राण झाला, तर प्रसंगावधान राखत दोन्ही शेतमजुरांनी गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे त्यांचे आणि एका बैलाचे प्राण वाचले.
हे वाचलं का? - फुरसुंगीत महावितरणाच्या रोहित्राला मध्यरात्रीच्या सुमारास आग
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप शेतकरी अनिल बोके यांनी केला. तसेच संबंधित डीपीबाबत वीज कंपनीला पूर्वसूचना सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये बळी गेलेल्या बैलाची नुकसान भरपाई वीज कंपनीने द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस व वीज वितरण कंपनीचेचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.