अमरावती - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३.३९ कोटींची आर्थिक अनियमितता सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीने या संपूर्ण व्यवहाराची माहिती मागितली असून जिल्हा उपनिबंधकांना ईडीने पत्र पाठवत विनाविलंब मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिक्षण अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
अमरावतीच्या जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असतांना दलाली देणे बंधनकारक नव्हते. त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यात थेट ईडीची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपा आमदार प्रताप अडसळ यांनी सातत्याने बॅंके विरुद्ध रान पेटवत यात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आता ईडीच्या पत्राने स्थानिक प्रशासन व बँकेच्या माजी पदाधिकारी व संचालकांच्या मनात धाकधुक वाढली आहे.