अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात बोगस बियाण्याची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. मध्यरात्री दत्तापूर पोलिसांनी धामणगाव रेल्वे येथे कारवाई केली. कृषी केंद्र व्यवसायिक रामेश्वर अमृतलाल चांडक या आरोपी कडून तबल ९ लाख किंमतीचे १ हजार बॅग बोगस कपाशीचे बियाणे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी रामेश्वर चांडक सह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली.तालुक्यातील नामांकित कृषी व्यावसायिक बोगस बियाण्याच्या व्यवसायात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात मोठया प्रमाणावर बोगस बियाणे विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला होती.त्याआधारे पाच दिवसापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कारवाईत ९ लाखांचे कापशीचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले होते.त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत अनधिकृत बिल्ला कंपनीचे सव्वा लाखांचे कपाशीचे बियाणे जप्त करण्यात केले होते.
बोगस बियाणे विक्री करणाऱ्या चांडक याने त्याच्याकडील एक हजार बॅग कपाशीचे बोगस बियाणे त्याने हिंगणगाव येथील एका ठिकाणी लपवून ठेवले होते.तालुक्यात होत असलेल्या कारवाईच्या भीती पोटी काल रात्री एक वाजताच्या दरम्यान ते बोगस बियाणे हिंगणगाव येथुन दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना पोलिसांनी सापळा रचत कासारखेड गावाजवळ हे बोगस बियाणे पकडून आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान हा आरोपी कच्चा सरकीवर प्रक्रिया करून त्याचे विविध बीटी वाण तयार करत असल्याचा संशय सुद्धा पोलिसांना आहे. ९ लाखाचे बोगस बियाणे व ३ लाख किंमतीचे वाहन असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई दत्तापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे यांनी केली आहे.