अमरावती - शहरात काँग्रेसची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. यासाठी स्वतःला नेते म्हणणारी मंडळी कारणीभूत आहे. त्यांची लोकप्रियता नसतानासुद्धा त्यांना आमदार व्हायचे आहे. यावेळी पक्षाने उमेद्वार निश्चित कारण्यासाठी त्यांच्या लोकप्रियतेबाबत पब्लिक सर्व्हे करावा, अशी मागणी माजी शहर काँग्रेस अध्यक्ष विश्वास देशमुख यांनी केली आहे.
आज विश्वास देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील काँग्रेसच्या विद्यमान परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यावर टीका केली आहे. रावसाहेब शेखावत यांना आपल्या मर्जीतले लोक सोबत हवे आहेत. आपले म्हणणे ऐकणारा अध्यक्ष हवा आहे. रावसाहेब शेखावत यांचा परिचय मी काँग्रेसचा शहर अध्यक्ष म्हणून अमरावतीकरांना करून दिला होता. ते आमदार झाल्यावर मला अध्यक्ष पदावरून बाजूला काढण्यात आले. माझ्यानंतर संजय अकर्ते यांनाही पदावरून काढण्यात आले. विधान परिषद निवडणुकीत अनिल माधोगडीया यांना पक्षाची उमेदवारी देऊन भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना निवडणून आणण्याचे काम अमरावतीत स्वतःला काँग्रेसचे नेते म्हणून घेणाऱ्या लोकांनी केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार न मिळणे हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
नवनीत राणा यांना नाईलाजाने काँग्रेसला पाठींबा द्यावा लागला. प्रचारादरम्यान लोकांनी आम्हाला नवनीत राणा चालतात, तुम्ही नको, असे म्हणून रावसाहेब शेखावत यांना गाडीतून खाली उतरून दिले होते. या गंभीर प्रकारावरून त्यांची लोकप्रियतेचा अंदाज येतो. आता विधानसभा निवडणूक लढण्याची माझ्यासह ज्यांची इच्छा आहे, अशा सर्वांची लोकप्रियता तपाससण्यासाठी पक्षाने पब्लिक सर्व्हे करावा आणि त्यानंतर योग्य व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही विश्वास देशमुख यांनी केली आहे.