अमरावती : ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या २५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहिर ( Gram Panchayat General Elections Announced ) झाल्या आहे. त्या अनुषंगाने तयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी निवडणूक निरीक्षक म्हणून राहणार आहेत.
संगणक प्रक्रियेद्वारे उमेदवारी अर्ज : उमेदवारांना उमेदवारी अर्ज व घोषणापत्र सहजरित्या भरता यावेत, याकरिता महाऑनलाइनच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. याद्वारेच उमेदवारांना उमेदवारी अर्ज व घोषणापत्र भरावे लागणार आहे. यासाठी उमेदवारांना संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
आयोगाच्या खबरदारीच्या सूचना : निवडणूक कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असेल, तर विभागीय आयुक्तांशी चर्चा करून मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. एका ग्रामपंचायतीकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात येणार आहे. त्यांच्या प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर नेमण्यात येणार आहे.
बहु सदस्य प्रभाग पद्धतीचे मतदान प्रक्रिये बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे . यामध्ये उमेदवारी अर्ज आयोगास द्यावयाचे अहवाल, आदर्श आचारसंहिता, उमेदवारी खर्च सादरीकरण यासह अन्य बाबींचे प्रशिक्षण राहणार आहे. मतदान केंद्रावर रॅम्प सुशिक्षित खोल्या प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी वीजपुवठा सुरक्षा भिंत आदींची सुविधा असल्याबाबत खात्री करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज सह निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणकाच्या माध्यमातून होत असल्याने यादरम्यान वीज पुरवठा कमी होणार नाही, याविषयी वीज कंपनीस कळवण्याची खबरदारीच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.
एका मतदार केंद्रात ८०० मतदार : आयोगाचे आदेशानुसार एक मतदान केंद्राला ८०० मतदार जोडले जाणार आहेत. या मतदान केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधा असाव्यात. याशिवाय संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राची यादी तयार करण्यात येणार आहे. आदर्श मतदान केंद्रांची संकल्पना राबविण्याविषयी सुचविले गेले आहे.