अमरावती - धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरुळ रोंघे येथे १८ ऑगस्ट रोजी श्रावण लांजेवार (वय ७० वर्ष) हे शेतकरी शेतातून परतत असताना बैलगाडी नाल्यातून काढताना पाण्याच्या प्रवाहात बैलगाडीसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर शासनाकडून देण्यात येणाऱ्या चार लाखाच्या मदतीच्या धनादेशावरून अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपा आमदार आणि काँग्रेसचे माजी आमदार यांच्यात श्रेयवादाचे केविलवाण राजकारण सुरू झालं आहे. एका वृद्ध शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही राजकीय पोळी भाजन्यासाठी त्यांच्या कुटूंबियाचा अपमानजनक प्रकार नेत्यांकडून होत आहे. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर श्रेयवादाचे खापर फोडले आहे.
श्रावण लांजेवार यांचं रामगाव विरुळ रोंघे शिवारात शेत आहे. १८ऑगस्ट रोजी श्रावण नेहमीप्रमाणे शेतात गेलेत. दरम्यान पावसाची संततधार सुरू असल्याने बराच वेळ वाट पाहून पाऊस थांबला नसल्याने त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे ते पाझर नाल्यामधून बैलगाडी काढत असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बैलगाडीसह वाहून गेलेत. बैलाचा दोर सुटल्याने बैल बाहेर पडू शकले. मात्र श्रावणला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वन भेटीसाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप गेलेत. त्यांनी कुटुंबीयांच सांत्वन केलं. काही वेळातच भाजपा आमदार प्रताप अडसड यांनी देखील कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांच्या मदतीने शासनस्तरावर योग्य ते दस्ताऐवज गोळा केल्या गेलेत. नैसर्गिक आपत्तीत शासन तात्काळ मदत करण्याचे आश्वस्त करते.
मात्र २० ऑगस्ट रोजी भाजपा कार्यकर्ता मंगेश गुल्हाने यांच्या हस्ते तहसील कार्यालय परिसरात मृतकाच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश देताना सोशल मीडियावर फोटो झळकला. तर काहीच तासात तोच धनादेश काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अमरावती येथील कार्यक्रमात वितरित करण्यात आला. काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप व त्याच्या कार्यकर्त्यांसह धनादेश वितरित केल्याचे छायाचित्रे देखील सोशल मीडियावर झळकले. त्यामुळे हा प्रकार समोर आला. यात मात्र मृतकाच्या कुटुंबियांची थट्टा केल्याची परिसरात चर्चा रंगू लागली आहे. यात पुन्हा एकदा जगताप आणि अडसड यांचा वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र तयार झाले आहे.
भाजपची भूमिका -
यासंदर्भात भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांनी भूमिका स्पष्ट केली आहे .या वृद्ध शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून शासन स्तरावर तहसीलदारांना निर्देश दिले होते .तात्काळ धनादेश बनवण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं होतं .आमच्या कार्यकर्त्यांनी तो धनादेश त्या शेतकऱ्याच्या नातेवाईकाला दिला होता दिला होता परंतु लगेचच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी तो चेक घेऊन त्या शेतकऱ्याच्या मुलाला अमरावतीच्या कार्यक्रमात नेऊन तेथे तो चेक दिला ही लाजिरवाणी आणि संतापजनक बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसड यांनी दिली आहे.
काँग्रेसची भूमिका -
या शेतकऱ्याच्या कटुंबाला तात्काळ मदत मिळावी म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी तहसीलदारांना फोन लावून तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले होते. परंतु भाजपाच्या लोकांनी मात्र श्रेयासाठी तो चेक स्वतः आणून त्या शेतकऱ्यांना प्रदान केला. तो चेक प्रशासकीय यंत्रेणेतील लोकांनी द्यायचा होता. भाजपा कार्यकर्ते प्रशासकीय यंत्रणेचा भाग नाही, अशी प्रतिक्रिया पंकज वानखडे, माजी सभापती पंचायत समिती यांनी दिली.