अमरावती : काही दिवसांपूर्वी कर्नाटक, आंध्र प्रदेशला लागून असलेल्या सीमा भागातील अनेक गावांनी आम्हाला महाराष्ट्रात राहायचे नाही, अशी भूमिका घेतली होती. आता अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत वसलेला धारणी तालुका मध्य प्रदेशात समाविष्ट करा, अशी नवी मागणी जोर धरायला लागली आहे. या संदर्भात 'धारणी मध्य प्रदेश जोडो संघर्ष समिती'चे मुख्य संयोजक श्रीपाल पाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. धारणीला मध्य प्रदेशात समाविष्ट करण्यासाठी लवकरच दिशा निश्चित करून आंदोलन करण्याची तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यप्रदेशात समाविष्ट करण्याची मागणी : पूर्वी मेळघाटात अनेक एसटी बस धावायच्या आता गतकाही वर्षांपासून एसटी बस सुविधा कुचकामी झाले आहेत. राज्य शासनाच्या अनियमितपणे बसेस धावत असतात यापेक्षा मध्य प्रदेशातील खाजगी बसेस या बराणपुर, खंडवासाठी नियमितरीत्या धावत आहेत. एकूणच धारणी तालुक्याच्या विकासासाठी ज्या काही सुविधा हव्या त्या सर्व सुविधा महाराष्ट्रापेक्षा मध्यप्रदेशातून उपलब्ध होणे सहज शक्य आहेत. यामुळे अमरावती जिल्ह्यात असणारा धारणी तालुका हा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात समाविष्ट करावा, असे श्रीपाल यांनी म्हटले आहे.
अमरावतीपेक्षा बऱ्हाणपूर जवळ : सातपुडा पर्वत रांगेत अमरावती जिल्ह्यात मेळघाटात वसलेला धारणी तालुका हा तीनशे किलोमीटरमध्ये पसरला असून या तालुक्यात छोटी मोठी एकूण 154 गावे आहेत. यापैकी एकूण सत्तर गावही मध्यप्रदेशच्या सीमेवर वसली आहेत. धारणी तालुक्यातील शेवटच्या गावापासून अमरावती शहराचे अंतर हे 190 किलोमीटर आहे. यापैकी 75 किलोमीटरचा रस्ता हा घाटातून जातो. यापेक्षा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर हा जिल्हा केवळ 80 किलोमीटर अंतरावर असून बऱ्हाणपूर आणि खंडवा ही दोन्ही शहर धारणीला चौपदरी रस्त्याने जोडली आहेत.
आरोग्य सुविधा मध्यप्रदेशमधून : धारणी तालुक्यात आरोग्य सुविधा या अमरावतीपेक्षा बऱ्हाणपूर येथून त्वरित उपलब्ध होतात. रक्ताची गरजही बऱ्हाणपूर येथून भागवली जाते. वीजदेखील मध्य प्रदेशातून मिळत असून एकूणच भौगोलिक दृष्ट्या आणि 1 मे 1960 च्या पूर्वी पूर्वी आम्ही मध्य प्रदेशातच असल्यामुळे आता देखील धारणीवासियांच्या सुविधेसाठी संपूर्ण धारणी तालुका हा मध्य प्रदेशात जोडला जावा, अशी आमची रास्त मागणी असल्याचे आंदोलनाचे प्रमुख श्रीपाल पाल 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाले.
धारणी परिसरातील अडचणी : धारणीपासून अमरावती शहर 145 किलोमीटर अंतरावर असून जिल्हास्तरीय कामासाठी धारणीवरून अमरावतीला जाणाऱ्या व्यक्तीला पूर्ण एक दिवस लागतो. त्याच दिवशी परत येणे शक्य होत नाही. धारणीतील बहुसंख्या आदिवासींना अमरावती शहराबाबत कुठलीच माहिती नसल्यामुळे तिथे गेल्यावर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अमरावतीवरून रात्री धारणीला परतताना जंगलात दोन ते तीन तासापर्यंत रस्ता बंद केला जातो. यामुळे अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे प्रचंड हाल होतात.
प्रशासनाचे दुर्लक्ष : अमरावतीचे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी हे धारणी तालुक्याकडे विशेष लक्ष देत नाही पाच ते सहा महिन्यापर्यंत त्यांचा धारणीला दौरा देखील होत नाही. शैक्षणिकदृष्ट्या देखील धारणी तालुक्यातील शिक्षण व्यवस्था ढासाळली आहे. अमरावतीवरून धारणी तालुक्यात कर्तव्यावर असणारे शिक्षक मोठ्या प्रमाणात रोज अपडाऊन करतात. अनेकदा तर ते शाळेत येत देखील नाहीत. या भागात शिकवण्याची त्यांची इच्छाच नाही केवळ नोकरी म्हणून अनेक शिक्षक नाक मुरडून या ठिकाणी कसेबसे काम करतात या संपूर्ण प्रकारामुळे या भागातील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासला असल्याची खंत देखील श्रीपाल पाल यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दौराच नाही : मेळघाटात उपोषणासह अनेक प्रश्न गंभीर असताना देखील 15 ते 20 वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धारणी तालुक्यात आले नाही. मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा धारणी तालुक्यात दौरा झाला होता. त्यानंतर पुढे एकही मुख्यमंत्री आमच्या भागात आले नाही. यापेक्षा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी गेल्या काही वर्षात दोन वेळा धारणीचा दौरा केला, असे श्रीपाल पाल म्हणाले.
व्यापारी दृष्ट्या मध्यप्रदेश सोयीस्कर : धारणी तालुक्याचा व्यापार हा अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि खंडवा या जिल्ह्यांसोबत जोडलेला आहे. धारणी तालुक्यातील रहिवाशांना अमरावती पेक्षा बराणपुर आणि खंडव्याला जाऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणे अतिशय सहज शक्य होते. भौगोलिक दृष्ट्या देखील धारणी तालुक्यातील सर्वच गावे ही मध्य प्रदेशातील गावांच्या संस्कृती सोबत एकरूप झालेली दिसतात. महाराष्ट्रापेक्षा धारणी तालुक्यातील लोकसंस्कृती ही मध्य प्रदेशातील लोकसंस्कृतीची जुळती मिळते आहे, असे देखील श्रीपाल पाल यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
वीज पुरवठा मध्यप्रदेशातून : धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील एकूण 180 गावांना मध्य प्रदेशातील नेपानगर येथून 132 केवी वीजपुरवठा केला जातो. लगतच्या अकोला जिल्ह्याने मात्र या दोन्ही तालुक्यात वीज पुरवठा करण्यास नकार दिला होता. मेळघाटातून अकोट ते खंडवा ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन धारणी तालुक्यातील जायची. आता मात्र महाराष्ट्र शासनाने धारणी तालुक्यातून जाणारा हा रेल्वे मार्ग बंद केला आहे. धारणी तालुका मध्य प्रदेशात जोडल्या गेला तर धारणी तालुक्यातून जाणारी ही गाडी पुन्हा सुरू होऊ शकेल, यामुळे धारणी तालुक्यातील 40 गावांना याचा लाभ होईल.
आरोग्य सुविधांपासून धारणी तालुका वंचित : भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे होत असताना अनेक शासकीय सुविधांपासून वंचित असणारा धारणी तालुक्यात आरोग्य सुविधांची कमी आहेत.आजपर्यंत आरोग्य सुविधा पुरविल्या जात नसल्यामुळे 1992 ते 2023 या 31 वर्षात विविध आजारांमुळे लहान बालक आणि माता यांचा मृत्यूचा आकडा 40 हजारांच्यावर गेला गेला आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात राहून आमच्या परिसरातील आदिवासींच्या समस्यांची दखल शासनाने कधी घेतलीच नाही. कुपोषण आणि आदिवासी उपाययोजनांच्या नावावर शासनाच्या वतीने खर्च करण्यात आलेले कोट्यावधी रुपये हे केवळ उच्च अधिकारी आणि सामाजिक संस्था चालविणाऱ्यांनीच लाटल्याचा आरोप देखील श्रीपाल यांनी केला.
राजकीय दृष्ट्याही अन्याय : गेल्या 62 वर्षांच्या इतिहासात अमरावती जिल्ह्यातून एकूण 24 जणांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र धारणी तालुक्यातील एकाही व्यक्तीला अशी संधी देण्यात आली नाही. आमचा परिसर कायम मागाच ठेवण्यात आला आमच्यावर राजकीय दृष्ट्या देखील अन्याय करण्यात आल्याची, खंत श्रीपाल पाल यांनी व्यक्त केली आहे. आज आम्ही धारणी तालुका मध्य प्रदेशात सामील करावा यासाठी राष्ट्रपतींना पत्र दिले आहे. यापुढे धारणी तालुक्याला न्याय मिळावा यासाठी आमच्या तालुक्याला मध्य प्रदेशात समाविष्ट करावे या मागणीसाठी तीव्र लढा उभारू, असा इशारा देखील श्रीपाल पाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.