अमरावती - वायगाव येथील सिद्धिविनायक गणपती मंदिराला साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. वायगावतील इंगोले कुटुंबियांच्या घरी १६७५ मध्ये खोदकामात सापडलेली गणपतीची पुरातन मूर्ती या मंदिरात स्थापन करण्यात आली आहे. येथे संकष्ट चतुर्थी, अंगरिका चतुर्थी, विनायकी चतुर्थी आणि गणपती उत्सव काळात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.
वायगाव हे सिद्धिविनायक गणपतीच्या गावासोबतच इंगोले कुटुंबियांचे गाव म्हणून ओळखले जाते. १६७५ साली इंगोले यांच्या वाड्यात खोदकाम सुरू असताना उजविकडे सोंड असणारी संगमरवरी गणपतीची मूर्ती आढळली. ही मूर्ती आढळताच सर्वांनाच आश्चर्य वाटले. इंगोले कुटुंबीयांनी ज्या वाड्यात गणपतीची मूर्ती सापडली, त्याच वाड्यात श्रींची विधिवत स्थापना केली.
वायगावचे सिद्धिविनायक मंदिर अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध व्हायला लागले. जिल्ह्यातील भाविक चतुर्थी आणि गणेशोत्सव काळात वायगावच्या सिद्धीविनायकाच्या दर्शनाला यायला लागले. इंगोले कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन २००० साली मंदिराची संस्थान म्हणून नोंदणी करुन घेतली. या संस्थेत इंगोले कुटुंबातील सदस्यांनाच घेण्यात आले. सिद्धिविनायकाची स्थपना असणाऱ्या पुरातन वाड्याची पडझड व्हायला लागल्याने मंदिर संस्थानने २००६ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला.
वायगावचे नागरिक आणि गणेशभक्तांच्या सहकार्याने सिद्धिविनायकाचे भव्य आणि देखणे मंदिर उभारण्यात आले. आता राज्य शासनाने वायगावला 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषीत केले आहे. संस्थानने स्वखर्चातून भक्तनिवास उभारले आहे. आज सिद्धिविनायक संस्थेकडे शेकडो एकर जमीन आहे. भविष्यात संस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसाठी या जागेचा वापर केला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यतील एकमेव नवसाला पावणारा गणपती, अशी वायगावच्या सिद्धीविनायकाची ख्याती आहे. संस्थेचे अध्यक्ष विलास इंगोले यांच्या मार्गदर्शनात केवळ संस्थेचे सदस्यच नव्हे, तर समस्त वायगावचे नागरिक आणि सिद्धिविनायकाचे भक्त मंदिरासह परिसराच्या विकासासाठी भक्तिभावाने प्रयत्न करीत आहेत. श्रीक्षेत्र वायगावच्या विकासासाठी शासकीय मदतही मिळावी, अशी भाविकांची अपेक्षा आहे.