अमरावती : विदर्भातील दुसरे महत्त्वाचे शहर असणाऱ्या अमरावतीच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील समृद्धीसाठी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झालेल्या शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाला कॉरिडॉरद्वारे जोडणे गरजेचे आहे. नाशिकला असा कॉरिडॉर शक्य झाला असून अमरावती देखील यासाठीची मागणी आता व्हायला लागली आहे.
अमरावतीपर्यंत तीन मार्ग : समृद्धी महामार्गावरून अमरावतीला येणाऱ्या वाहनांसाठी अमरावती शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी 60 किलोमीटरवर असणाऱ्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील आसेगाव आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा पासून 66 किलोमीटर अंतर गाठावे लागते. यापैकी सर्वात जवळ असणाऱ्या शिवणी पासून अमरावतीपर्यंत येण्यासाठी एक ते दीड तास लागतो. त्यातही बऱ्याच ठिकाणी मार्ग खराब असल्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करून आल्यावर हा दीड तासाचा प्रवासाचा अनुभव अतिशय खराब येतो.
तीस किलोमीटरचा कॉरिडॉर शक्य : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथून अमरावती शहरालगत बडनेरा जेरी मंदिरापर्यंत 30 किलोमीटरच्या अंतरापर्यंत या कॉरिडॉरची निर्मिती होणे शक्य आहे. बडनेरा मार्गावरील जिरी येथून नागपूर महामार्गावरील रहाटगाव पर्यंत सध्या ध्रुतगती महामार्ग सुरू आहे. हा कॉरिडॉर झाल्यास वरुड मोर्शी चांदूरबाजार अचलपूर अंजनगाव सुर्जी या भागातील संत्रा उत्पादकांना तसेच कापूस उत्पादकांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.
अमरावतीच्या उद्योगात भरभराट : अमरावती शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर नांदगाव पेठ येथे पंचतारांकित एमआयडीसी आहे. या एमआयडीसीत अद्यापही मोठे उद्योग आले नाहीत. अमरावतीत प्रचंड मोठी कापड बाजारपेठ आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संत्र्यासह कापसाचे उत्पादन होते. समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील संत्रा कापूस आणि इतर कृषी मालाला मुंबई पुढे ही बाजारपेठ उपलब्ध सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या समृद्धी महामार्गाला अमरावतीशी जोडण्यासाठी समृद्धी सारखाच कॉरिडॉर निर्माण व्हायला हवा, असे क्रेडाई सदस्य शैलेश वानखडे यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना म्हटले आहे.
नाशिकप्रमाणे व्हावेत प्रयत्न : समृद्धी महामार्गावरून नाशिक शहराला थेट जोडण्यासाठी सुमारे 60 किलोमीटरचा कॉरिडॉर मंजूर झाला आहे. अशाच प्रकारचा कॉरिडॉर शिवडी ते अमरावती दरम्यान निर्माण होडे गरजेचे आहे. यासाठी क्रेडाई सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन या कॉरिडॉर साठी प्रयत्न करणार. हा कॉरिडॉर झाला तर अमरावतीचा विकास आणखी झपाट्याने होईल असा विश्वास देखील शैलेश वानखडे यांनी व्यक्त केला.