अमरावती - परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. सध्या शेतात शिल्लक राहिलेल्या कपाशीचे पीक हाती मिळेल, अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे. मात्र, कापसाची वेचणी करण्यासाठी मजूरीने प्रचंड महाग पडत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणी म्हणजे नाकापेक्षा मोती जड, अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुसरीकडे घरात आलेल्या कापसाची पत चांगली नसल्याने योग्य भावही शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे समोर आले आहे.
भावावर परिणाम
कापसाची वेचणी वेळेवर केली नाही, तर प्रतवारी खराब होते. त्याचा प्रत्यक्ष परिणाम कापसाच्या भावावर होतो. वेळेवर कपाशीची वेचणी झाली, तर अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. परंतु बोंडअळीमुळे कापूसवेचणी ही महाग पडत आहे. साध्य एक किलो कापूस वेचायला २० रुपये खर्च येतो. मागील मागील वर्षी ८-१० रुपयांत एक किलो कापूस वेचला जात होता. परंतू यावर्षी कापूस वेचणीला महाग पडत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मजुरांनी मागीलवर्षी पाच ते सहा रुपये प्रती किलो दराने कपाशीची वेचणी केली होती. यंदा मात्र वेचणी महाग झाल्यामुळे कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात घट होणार आहे.
कपाशी लागवडीत यंदा वाढ
हवामान खात्याने यावर्षी पाऊस चांगला होण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे खरिपाच्या नियोजनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या पेरणीला पसंती दिली. कपाशीचा पेरा दरवर्षीच्या तुलनेत वाढला होता. मात्र, परतीच्या पावसाने घरात येणारे सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले. काही प्रमाणात शेतात शिल्लक राहिलेले सोयाबीन घरात आणण्यासाठी तसेच कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
पांढरे सोने झाडावरच काळे होण्याचे चिन्हे
यावर्षी वेचणीचा दर दुप्पट झाला आहे. १८ ते २० रुपये प्रती किलोमागे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. यानंतरही मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वेचणीला मजूर मिळत नसल्याने पांढरे सोने झाडावरच काळे होण्याच्या स्थितीत आहे. कापूस खराब झाला, तर योग्य भाव मिळत नाही. वर्षभराची उलाढाल ज्या शेतातील नगदी उत्पन्नावर अवलंबून आहे, असे पांढरे सोने मजूर मिळत नसल्याने डोळयासमोर उद्ध्वस्त होताना दिसत आहे. त्यामुळे वर्षभराचे नियोजन कसे करायचे, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून पणन महासंघ व सीसीआयच्या माध्यमातून शासकीय कापूस खरेदी सुरू झाली आहे. पणन महासंघाने यंदा अमरावती, दर्यापूर, वरूड व इतर दोन अशा एकूण पाच ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात केली आहे, मात्र कापसाचे उत्पादन प्रचंड कमी आहे.
एक क्विंटल कापूस वेचायला २ हजार खर्च
कापूस वेचणीचा शेतकऱ्यांचा खर्च विचारात घेता हा खर्च क्विंटलमागे २ हजार रुपयांपर्यंत जात आहे. मोजणीतही घट येत आहे. त्यातच मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांची अवस्था‘नाकापेक्षा मोती जड’ अशी झाली आहे.