अमरावती - लोकशाहीतील महत्त्वाचा मानला जाणारा मतदानाचा हक्क बजाविण्याची जनजागृती आणि उत्साह आज राज्यभरात दिसून येत आहे. मात्र जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात परिस्थिती वेगळी आहे. या तालुक्यातील कोंडवर्धा, ईनायतपूर , तळेगाव मोहना, बोरगाव मोहना,मासोद या गावातील प्रकल्पग्रस्तांनी मतदानावर संपूर्ण बहिष्कार टाकला आहे.
जमिनीचा मोबदला कमी मिळाला असल्याची चांदूर बाजार तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची तक्रार आहे. त्याचबरोबर त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्नही सुटलेला नाही. प्रकल्पग्रस्तांनी राज्य सरकारकडे नोकऱ्यांची मागणी केली होती. मात्र सर्व आश्वासनांची पूर्तता करणार असल्याची घोषणा करुनही राज्य सरकारने त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी बहिष्कार टाकत मतदान करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे.
परिसरातील जवळपास ८०० मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. याच परिसरात असणाऱ्या तळेगाव मोहना या गावातील जवळपास ५०० घरांतील प्रकल्पग्रस्तांनीही आज मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी आश्वासने दिली मात्र कुणीही मागण्या पूर्ण केल्या नाहीत, असे अनेक ग्रामस्थ सांगत आहेत.