अमरावती - खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या घरी लाखो क्विंटल कापूस पडून आहे. शासनाच्या वतीने कापूस विक्रीसाठी 3 ते 6 जून दरम्यान पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सकाळपासूनच हजारो शेतकऱ्यांच्या रांगा अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लागत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी तात्पुरत्या टोकण पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी बाजार समितीला दिल्या आहेत.
टोकण पद्धतीचा अवलंब केल्याने कापूस नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, अमरावती आणि भातकुली या 3 तालुक्यातील शेतकरी हे कापूस नोंदणीसाठी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येत आहेत. कापूस नोंदणीचा अवधी केवळ 4 दिवसांचा आणि शेतकऱ्यांची संख्या ही हजारोंच्या घरात असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत होते. आता कोरोनाचा धोका टाळण्यासाठी व शेतकऱ्यांचा त्रास काही प्रमाणात कमी होण्यासाठी तात्पुरती टोकण पद्धती अवलंबली जाणार आहे.
अशी असणार तात्पुरती टोकण पद्धत
शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाव नोंदणीसाठी येताच त्यांना एक अर्ज भरायचा आहे. हा अर्ज भरून तत्काळ बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांजवळ द्यायचा. हे अर्ज घेतल्याबरोबर संबंधित कर्मचारी शेतकऱ्याला एक तात्पुरते टोकण देतात. या टोकणवर शिक्का व पक्के टोकण ज्या दिवशी देण्यात येईल, त्या तारखेचा उल्लेख असणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी गर्दी कमी झाली. दरम्यान, हे तात्पुरते टोकण घेऊन शेतकरी 10 तारखेनंतर त्यांना दिलेल्या तारखेनुसार बाजार समितीत येऊन पक्के टोकण घेऊन जातील, त्यामुळे गर्दी होणार नाही.