अमरावती - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात मंगळवारी सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे या भागांसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
रब्बी हंगामातील काढणीला आलेला हरभरा पावसात भिजला असून, वादळी वाऱ्यामुळे गहू जमिनदोस्त झाला आहे. या मुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणीकरून सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - अमरावतीत अंध विद्यार्थ्यांनी साजरी केली होळी; तरुणांचा उपक्रम
या मोसमात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार रब्बीतील पिकांवर होती. मात्र, आताही अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.