अमरावती- देशात व राज्यात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणू आजाराच्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार पध्दतीचा अवलंब व्हावा, यासाठी अमरावती शहरापासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुकडोजी महाराजांच्या मोझरी मधील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या परिसरातील एका सुसज्ज इमारतीत पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे सुमारे 350 खाटांचे सुसज्ज कोव्हिड रुग्णालय कायमस्वरुपी निर्माण करण्यात येणार आहे.
कोरोनाचे संकट गेल्यावर सुध्दा हे मोझरी येथील हे रुग्णालय इतर विविध आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगात येणार आहे. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहेत, त्याठिकाणी कोव्हिड रुग्णालय स्थापन करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. याचा भाग म्हणून मोझरी सह अचलपूर येथील ट्रामा केंद्राच्या जागेत तसेच चांदूर बाजारच्या ग्रामीण रुग्णालयात 100 बेडचे कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात कोरोना आजारासंबंधी सर्व आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज ठेवण्यात येणार आहे.
भविष्यात सुध्दा जिल्ह्यात कोरोना सारखी आपत्तीचे पुनरागमन झाल्यास त्याठिकाणी तत्काळ उपचार होणार आहेत.