अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लिम होते, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी शुक्रवारी शिवप्रतिष्ठानच्यावतीने येथील जय भारत सभागृहात आयोजित सभेत केले होते. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. अमरावतीत या विषयावरून मागील तीन दिवसांपासून राजकारण तापले आहे. संभाजी भिडेंवर कारवाई करावी या मागणीसाठी आज आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहेत. दरम्यान भिडे यांच्या निषेधार्थ आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात शनिवारी राजकमल चौक येथे आंदोलन करण्यात आले होते. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर संभाजी भिडेंविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला. त्यांना रविवारी सायंकाळपर्यंत अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला होता.
यशोमती ठाकूर विरुद्ध कारवाईची मागणी : शिवप्रतिष्ठानच्यावतीने आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी रविवारी शेकडो धारकरी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धडकले होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या धारकऱ्यांचे नेतृत्व करीत आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली होती. संभाजी भिडेंची बाजू घेणाऱ्या खासदार अनिल बोंडे यांचा देखील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
यशोमती ठाकूर यांना धमकी : संभाजी भिडे विरोधात आवाज उठवल्यामुळे कैलास सूर्यवंशी नामक व्यक्तीने सोशल मीडियावरून यशोमती ठाकूर यांना तुमचा दाभोलकर करू, अशा स्वरूपाची धमकी दिली आहे. या धमकीमुळे देखील काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संभाजी भिडे विरोधात काँग्रेसने आंदोलन छेडल्यामुळे पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालय ते गर्ल्स हायस्कूल चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दंगा नियंत्रण पथक, अग्निशमन दल जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सज्ज आहेत.
आंदोलनात यांचा सहभाग : संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने अमरावती जिल्ह्यात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमटे, विलास इंगोले यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि एनएसयुआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत.
हेही वाचा:
- NCP Agitation : सोलापुरात अनोखे आंदोलन; संभाजी भिडेंच्या पुतळ्याचे खाली मुंडी, वर पाय करत राष्ट्रवादीकडून निषेध
- Prithviraj Chavan : राजकीय टीका करा, मात्र समाजविघातक वक्तव्य खपवून घेणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा थेट इशारा
- Vijay Wadettiwar : तरुणांच्या मनात विष पेरण्याचे काम संभाजी भिडे करतायेत - विजय वडेट्टीवार