अमरावती - अप्पर वर्धा धरणातून टंचाईग्रस्त तिवसा मतदारसंघातील गावांना पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र, भाजप आमदारांच्या दबावात येऊन सिंचन विभागाच्या मुख्य अभियंत्याने जिल्हाधिकाऱयाच्या निर्णयास केराची टोपली दाखवली. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी त्या अभियंत्यास चांगलेच धारेवर धरले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीतच आमदार यशोमती ठाकूर यांनी रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे उपस्थित सारेच आवाक झाले होते.
यशोमतींनी असा केला राग व्यक्त -
आमदार यशोमती ठाकूर यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. आमदार ठाकूर यांनी कागदपत्रे अभियंता लांडेकर यांच्या दिशेने भिरकावली. तसेच त्यानंतर त्यांनी काचेच्या ग्लासवरील प्लास्टिकची प्लेट लांडेकर यांच्या दिशेने भिरकावली. यावेळी यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
'यशोमती' आणि 'निवेदिता' एकमेकांना भिडल्या
बैठकीला उपस्थित भाजपच्या नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या कट्टर विरोधक निवेदिता चौधरी यांनी यशोमती ठाकूर यांना सभ्यपणे वागा, असा सल्ला दिला. मात्र, हा सल्ला ऐकताच तिवसा मतदारसंघातील ग्रामस्थांनी निवेदिता चौधरी यांना जोरदार विरोध केला.
विजय वडेट्टीवार आणि रणजित कांबळे यांनी लांडेकर यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन का केले नाही? असा जाब विचारताच एका तासात अप्पर वर्धा धरणातील पाणी तिवसा मतदारसंघातील गावांसाठी सोडण्यात येईल, असे लांडेकर यांनी सांगितले. आमदार यशोमती ठाकूर यांनी लांडेकर यांना चांगलेच झापले. तसेच त्यांनी सेवनिवृत्तीपूर्वी ते निलंबित कसे होत नाहीत हे पाहून घेऊ, असा दमही दिला.
आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर, राजूरवाडी, निंभारणी, शिरुळ, दापोरी, वरुडा, करजगाव, जावरा फत्तेपूर, धमंत्री, येवती, डेहणी, पिंपळखुटा, कवठाळ, तळेगाव ठाकूर, मार्डी, मोझरी, जहागिरपूर, नया वाथोडा, मसदी, घोटा, वऱ्हा, मसदी आदी गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
पाण्यासाठी असा होता आदेश -
या गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली होती. यावेळी अप्पर वर्धा धरणातील पाण्याची स्थिती पाहून २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी तिवसा मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांसाठी अप्पर वर्धा धरणातून ०.२ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वर्धा नदीत १२ मे रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हे पाणी सोडण्यात येणार होते.
रात्री पाणी येणार म्हणून टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ वाट पाहत होते. तेव्हा मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांना अप्पर वर्धा धरणातील पाणी सोडू नये, असे आदेश दिले. आमदार बोंडे यांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून रविवारी रात्री अप्पर वर्धा धरणातील पाणी सोडण्यात आले नाही.
दरम्यान, भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे पाण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप करून आमदार यशोमती ठाकूर यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार ठाकूर यांना आज बैठकीत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविले होते. ऐनवेळी निवडणूक आयोगासोबत जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्याने आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱयांच्या दालनासमोर ठिय्या मांडला होता.
आज दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत आलेले विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, आमदार रणजित कांबळे, काँग्रेस प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, चांदुर रेल्वेचे आमदार प्रा. वीरेंद्र जगतात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे आमदार ठाकूर यांना भेटायला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यानंतर सिंचन भवन येथे पालकमंत्री प्रवीण पोटे अप्पर वर्धा धरणातील पाणी परिस्थिती बाबत बैठक घेत असल्याचे कळताच आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेते आणि कार्यकर्ते सिंचन भवन येथे जाऊन धडकले.
यावेळी आमदार ठाकूर बैठकीत उपस्थित सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांच्यावर भडकल्या. लांडेकर आमदार डॉ. अनिल बोंडे यांचे नातेवाईक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मानत नाहीत, असा आरोप आमदार ठाकूर यांनी यावेळी केला.
पालकमंत्री मी पण होतो -
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पाणी सोडण्याबाबत माझे आदेश तयार व्हायचे असल्याने पाणी सोडले नाही, असे म्हणतात माजी पाणीपुरवठा मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी आम्ही पण पालकमंत्री होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा आदेश दिले की ते सर्वोपरी असतात. आम्हाला काय कळत नाही का ? अशा शब्दात पोटे यांना सुनावले तेव्हा पोटे निःशब्द झाले. यानंतर आमदार डॉ. सुनील देशमुख सुद्धा या बैठकस्थळी पोहोचले होते.