अमरावती - वर्धा लोकसभेचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ शनिवारी अमरावतीच्या जरूड येथे प्रचार सभा झाली. यावेळी एका तरूणाने आमदार अनिल बोंडे यांना विकास कामासंदर्भात काही प्रश्न विचारल्याने सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. विकासाची अपेक्षा ठेऊन प्रश्न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केल्याने लोकशाही ही पायाखाली तुडवल्या गेल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
अमरावतीच्या जरूड येथे शनिवारी वर्धा लोकसभेचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी खासदार अनंत गुढेही उपस्थित होते. आमदार अनिल बोंडे यांनी सभेला संबोधीत करायला सुरुवात करताच अतुल देशमुख या युवकाने उभे होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शरद उपसा योजनेचे कर्ज माफ झाले नाही, तसेच गेल्या ५ वर्षातही खासदार रामदास तडस यांनी जरूड गावाला एकही रुपयांचा निधी दिला नाही. तर, निवडणुकीच्या तोंडावर १० लाखांचा निधी देऊन दिंडोरा पिटतात, असा आरोप करत या युवकाने थेट आमदार बोंडेंनाच उत्तर मागितले. तेव्हा आमदार महोदय हे लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या तरुणावर जाम भडकले. येथे पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरीता ग्रामपंचायत आहे. ते काम सरपंचाचे असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
याच दरम्यान सोपान ढोले यांनीही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या प्रश्नालाही डावलण्यात आले. लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या या मतदारांना लोकप्रतिनिधींनी उत्तर देण्याऐवजी पोलिसांना सूचना देऊन त्यांना अटक करून कारवाई करण्याचे फर्मानच काढल्याचे पाहायला मिळाले. प्रचार सभा संपताच एक तासाच्या आताच प्रश्न विचारणाऱ्या युवकाला पोलिसांनी घरी जाऊन अटक केल्याने शेकडो ग्रामस्थ पोलीस चौकीवर धडकले. शेवटी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास या युवकाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करत त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान आमदार अनिल बोंडे यांनी या युवकाची दमदाटी करून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.