अमरावती- जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यातच अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयातील साठ वकिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काल (शुक्रवार) न्यायालयाला सुट्टी असल्याने आज (शनिवार) सकाळपासूनच न्यायालयामध्ये नागरिकांची तसेच वकिलांची मोठी गर्दी दिसून आली. परंतु ही गर्दी टाळण्यासाठी आता सोशल डिस्टन्ससोबत टोकन घेतल्यानंतरच न्यायालयमध्ये प्रवेश मिळत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
पूर्वी एका पक्षकारास सोबत पाच पेक्षा जास्त लोक न्यायालयात जात होते. परंतु आता त्यावर न्यायालयाने बंदी आणली असून पक्षकारास सोबत कमीत कमी व्यक्तीनांच न्यायालयात प्रवेश मिळणार आहे. अमरावतीमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय न्यायालय प्रश्न न्यायालयाने घेतला आहे .
लॉकडाऊनसाठी प्रशासन लागले कामाला
तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यामध्ये आज (शनिवारी) रात्री आठ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल 36 तास लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर अर्थातच बाजारपेठांमध्ये आता जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ३६ तासाच्या या लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासनान, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, ग्रामीण भागातील स्वराज्य संस्था देखील कामाला लागल्या आहे.