अमरावती - मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन हे पावसामुळे शेतातच सडत आहे. तसेच कापणी केलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत. सोयाबीन, उडीद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याचे तत्काळ सर्वेक्षण करून प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्याकडे केली. अनेक शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन हे अप्पर जिल्हाधिकारी यांना दाखवण्यात आले.
हेही वाचा - मुंबईत भाऊबीज उत्साहात साजरी
सतत सुरू असलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यासह धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगांव खनडेश्वर या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशीच शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनची कापणी करून ठेवली, त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन सडले आहे. तर, जे सोयाबीन काढून घरी आणले त्याची ढेप होण्याच्या मार्गावर आहे .
हेही वाचा -सरकार स्थापनेवेळी शिवसेना आमच्यासोबत राहील - रावसाहेब दानवे
सोयाबीन बाजारपेठेमध्ये विकायला नेल्यास तिथे बाजारभाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणून नुकसान झालेल्या शेतीचे तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी संयुक्तिक नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागील केली. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीनी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तालुका स्तरावर तहसील कार्यालयामार्फत द्यावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्याकडे केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडानेसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.