अमरावती : रंगीबेरंगी गळ्याचा सरड्याचा प्रणयाचा काळ आला की सरड्याच्या गळ्याचा खालचा भाग रंगीत होतो. मादीला आकर्षित करण्यासाठी हा सरडा स्वतःच्या गळ्यातील पोळे मागेपुढे करून मादीला आकर्षित करतो. दिसायला अतिशय सुंदर आणि दुर्मिळ असणारा हा रंगीला सरडा मध्य महाराष्ट्रात आढळून आला आहे. हा रंगीत सरडा सध्या वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकारांना आकर्षित करतो आहे. विशेष म्हणजे या सरड्याचे पृथ्वीवरचे अस्तित्व हे 26 लाख वर्षा पूर्वीपासून असल्याची नोंद आहे.
अमरावती लगतच्या जंगलात झाले दर्शन : मारान शेतीचा परिसर आणि विरळ मनुष्य वस्ती लगतच्या जंगलात हा रंगीला सरडा आढळतो. अमरावती येथील वन्यजीव छायाचित्रकार डॉक्टर तुषार अंबडकर, विनय बडे अमित सोनटक्के आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांना हा सरडा नुकताच अमरावती शहरालगतच्या जंगलात आढळला. पालीच्या आकाराच्या या सरड्याला इंग्रजीमध्ये 'फॅन थ्रोटेड लिझर्ड ' असे म्हणतात. हा सरडा डेक्कन में सीन्स या शास्त्रीय नावाने ओळखला जातो अशी माहिती वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
असे आहे या सरड्याचे वैशिष्ट्य : पुणे ,नाशिक ,अहमदनगर आणि जालना या जिल्ह्यात हा सरडा दिसतो उर्वरित महाराष्ट्रात मात्र याचे दर्शन दुर्मिळ आहे. नीलपंखी या नावाने देखील हा सरडा ओळखला जातो. या सरड्याची लांबी 22 ते 23 सेंटीमीटर पर्यंत असून आकाराने हा सरडा लहान आहे. छोटी किटकन या सरड्याचे मुख्य खाद्य आहे या प्रजाती बद्दलचे वर्णन सर्वात आधी शास्त्रज्ञ जॉर्डन यांनी इसवी सन 1870 मध्ये केले आहे. हा सरडा भारतासाठी स्थान विशिष्ट प्रजाती म्हणून प्रसिद्ध आहे .
सरड्याच्या पाच नवीन प्रजातींचा शोध : डॉक्टर वरद गिरी ,डॉक्टर दीपक वीरप्पन ,मोहम्मद आसिफ काझी आणि प्रवीण करंट या संशोधकांनी संपूर्ण भारतभर तब्बल तीन हजार सहाशे किलोमीटर फिरून या सरड्याच्या तब्बल पाच नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. या पाचही प्रजाती जगासाठी नवीन ठरल्या आहेत. अमरावती परिसरात या सरड्याचे दर्शन येथील जैव विविधतेचे महत्व पुन्हा नव्याने अधोरेखित करणारे असल्याचे यादव तरटे यांनी सांगितले.
सरड्याचे दर्शन प्रेरणादायी : आम्ही अमरावती शहरालगत असणारे तलाव जंगल यासह मेळघाटचे जंगल पोहरा जंगल या ठिकाणी नियमित वन्यप्राणी, विविध पक्षी टिपण्यासाठी नियमित जातो. मात्र, आपल्या परिसरात या सरड्याचे झालेले दर्शन मनाला आनंद देणारे आहे. अमरावती जिल्ह्यात आढळलेल्या या रंगीला सरड्यावर संशोधन व्हावे त्याचे जतन व्हायला हवे . या सरड्याचे दर्शन झाले तो प्रसंग आम्हाला प्रेरणा देणारा असल्याचे डॉक्टर तुषार अंबडकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.