अमरावती - कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी अंजनगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोरोना संदर्भात ग्रामीण रुग्णालयात आणि तालुक्यात होत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेण्याकरिता अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दि.१७ ला दुपारी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्यात.
शहरात भरत असलेल्या भाजी बाजारासंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बाजारात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याकरिता दिलेल्या सूचनांचे आपण पालन का करित नाही, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केला. बाजारामध्ये दोरी लावून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला लावा, अशा सूचना अंजनगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन त्यांच्या कर्ज शैलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य अधिकाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केली.
मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहूरवाघ यांच्या कार्यशैलीबाबात या अगोदरही तहसीलदार अंजनगांव यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती हे विषेश. तसेच ग्रामीण भागातसुद्धा सोशल डिस्टन्सिंगसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयासमोर भरत असलेल्या भाजीबाजार भरू नये यासाठीही मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
दरम्यान, यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर,तहसीलदार विश्वनाथ घुगे,मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, गटविकास अधिकारी तूकाराम भालके,तालूका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे, प्रभारी अधिक्षक ग्रामीण रुग्णालय राजेंद्र राहाटे, ठाणेदार राजेश राठोड यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.